पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असं विधान सर्वपक्षीय बैठकीत केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान राहुल गांधी नव्याने ट्विट केलं आहे. त्यांनी वृत्तवाहिनीचा एक व्हिडीओ शेअर करत सॅटेलाइट फोटोत चीनने कब्जा केल्याचं स्पष्ट दिसतंय असं सांगत पुन्हा एकदा मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पंतप्रधानांनी भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं म्हटलं आहे. पण सॅटेलाइट फोटोत चीनने पँगाँग येथे पवित्र भारतीय जमिनीचा ताबा घेतल्याचं दिसत आहे”.

याआधी राहुल गांधी यांनी शनिवारी सकाळी ट्वीट करून केंद्र सरकारला धारेवर धरलं. चिनी सैनिक भारताच्या भूभागात घुसले नव्हते, तर मग जवान शहीद कसे झाले? जवान नेमके कुठे (भारताच्या की चीनच्या हद्दीत) शहीद झाले, असे प्रश्न विचारण्याबरोबरच चिनी आक्रमणासमोर पंतप्रधानांनी माघार घेतली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. यासोबतच नरेंद्र मोदींवर टीका करताना सरेंडर मोदी असा उल्लेख केला आहे.