कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी घोडेबाजार तेजीत असून शनिवारी दुपारी काँग्रेसने कथित ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. यात येडियुरप्पांच्या निकटवर्तीयांनी काँग्रेस आमदारांना पैसे व मंत्रीपदाची ऑफर दिल्याचे म्हटले आहे. या दोन्ही सीडींची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने शनिवारी दुपारी दोन ऑडिओ क्लिप जाहीर केल्या असून यातील एका संभाषणात येडियुरप्पांचे उजवा हात म्हणून ओळखले जाणारे पुट्टस्वामी यांचा आवाज असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.  काँग्रेस आमदाराची पत्नी असल्याची बतावणी करत एक महिला पुट्टस्वामींच्या संपर्कात आली. पुट्टस्वामींनी तिला फोन करुन पतीला भाजपाला मतदान करायला सांगा, असे सांगितले.  बहुमत चाचणीत भाजपाला मतदान केले तर १५ कोटी रुपये दिले जातील. मताच्या मोबदल्यात मंत्रीपद हवे असेल तर महत्त्वाच्या खात्यात मंत्रिपद आणि ५ कोटी रुपये दिले जातील, असे आमीष पुट्टस्वामींनी दाखवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

याच महिलेशी येडियुरप्पांच्या मुलानेही दुरध्वनीवरुन चर्चा केली. माझ्या मुलाविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याचे काय, असा प्रश्न त्या महिलेने विचारला होता. यावर येडियुरप्पांच्या मुलाने ‘गुन्ह्यांची चिंता करु नका, आमच्याविरोधातही ३० हून अधिक गुन्हे होते. पण त्यातून सुखरुप बाहेर पडलो’, असे सांगितल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या संभाषणावरुन भाजपाने लोकशाहीची हत्या केल्याचे स्पष्ट होते, असे काँग्रेसने नमूद केले. या संभाषणांची सीडी आम्ही तपास यंत्रणांना द्यायला तयार असून या सीडींची हायकोर्टातील विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या आरोपांवर भाजपाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, शुक्रवारी देखील काँग्रेसने भाजपाचे खाणसम्राट नेते जर्नादन रेड्डी हे आपल्या आमदाराला लालूच दाखवत असल्याची कथित ऑडिओ क्लिप जारी केली होती. या संभाषणात बसवगोंडा दद्दाल या काँग्रेस आमदाराला रेड्डी मंत्रीपद देण्याची ग्वाही देत आहेत. तसेच तुम्ही जितके कमावले, त्याच्या शंभरपट कमावयाला तुम्हाला वाव मिळेल, असेही सांगत असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.