काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरुन हटवण्यात आले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक गहलोत यांनी याबाबत पक्षाच्या निर्यणाचे अधिकृत पत्र दत्त यांना यापूर्वीच दिले आहे. या निर्णयाद्वारे काँग्रेसने दत्त यांना मोठा झटका दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काल काँग्रेसच्या बैठकीत प्रिया दत्त यांची उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा केली. मात्र, दत्त यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी २६ सप्टेंबर रोजी प्रिया दत्त यांना पाठवलेल्या पत्रात त्यांना सचिव पदावरुन हटवण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये दत्त यांच्या कामगिरीचे कौतुकही करण्यात आले आहे. तसेच भविष्यात त्यांची पक्षाला गरज असल्याचेही गहलोत यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून प्रिया दत्त यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, या घोषणेला विरोध करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीतच गोंधळ घातला. प्रिया दत्त या २०१४ पासून या मतदारसंघात फिरकलेल्या देखील नाहीत, तरीही त्यांच्या नावाची घोषणा कशासाठी, असा सवाल कार्यकर्त्यांनी निरुपम यांना केला होता.