आयएनएक्स मीडियाशी संबंधित प्रकरणात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. चिदंबरम यांना झालेल्या अटकेवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढावला. अर्थव्यवस्था आणि देशातील इतर मुद्यांवरून लक्ष वळवण्यासाठी हा खेळ सुरू आहे. सरकारकडून सीबीआय आणि ईडीचा वापर सूड घेण्यासाठी केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

आयएनएक्स भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून, चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, मागील दोन दिवसांपासून लोकशाहीची हत्या होत असल्याचे देश माध्यमांवरून बघत आहे. भाजपा सरकारने ईडी आणि सीबीआय या तपास संस्थाचा वापर सूड उगवण्यासाठी केला आहे. या आकसातूनच माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांना अटक केली आहे. अर्थसमोरील संकट, बेरोजगारी, रूपयाची होत असलेली घसगुंडी इतके सगळे प्रश्न सध्या देशासमोर उभे आहेत. त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मोदी सरकार कोणत्या थराला आम्ही बघणार आहोत, असा इशारा सुरजेवाला यांनी दिला.

चिदंबरम यांना केलेली अटक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मोदी सरकारच्या राजकीय आणि वैयक्तिक द्वेषातून केलेली कारवाई आहे. चिदंबरम यांच्यावर जे आरोप सीबीआय आणि ईडी करीत आहे. वस्तुस्थिती मात्र त्याविरूद्ध आहे, असेही सुरजेवाला यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, चिदंबरम यांना बुधवारी ताब्यात घेतल्यानंतर रात्री चौकशी केली. आज सीबीआय त्यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार आहेत. तसेच याप्रकरणात चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी सीबीआय मागणार असल्याचे वृत्त आहे.