अखिलेश यादव यांचे काँग्रेसला आवाहन

लखनौ : काँग्रेसला खरोखर भाजपला रोखण्याची इच्छा असेल तर त्यांनी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे.

प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचे स्वागत करून त्यांनी सांगितले की, काँग्रेसला जर खरोखर भाजपशी लढायचे असेल तर त्यांनी आमच्या युतीस पाठिंबा द्यावा. आम्ही रायबरेली व अमेठी या दोन जागा आधीच काँग्रेसला सोडल्या आहेत. गुजरात असो की उत्तर प्रदेश सगळीकडे आम्ही फ्रंटफूटवरच खेळणार आहोत असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडे केले होते त्यामुळे अखिलेश यांच्या पाठिंब्याच्या आवाहनास वेगळा अर्थ आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशात सरचिटणीस नेमल्याबाबत विचारले असता अखिलेश म्हणाले की, त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे स्वागतच आहे. जास्तीत जास्त तरुणांनी नव भारताच्या निर्मितीसाठी राजकारणात यावे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाची बैठक प्रयागराजच्या कुंभमेळ्यात घेतल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘माझी पत्नी डिंपल यादव हिचा मतदारसंघ कनौज आहे त्या मतदारसंघाचा कुंभाशी संबंध आहे. राजा हर्षवर्धनाची राजधानी कनौज होती, त्या राजाने दानाची परंपरा कुंभात सुरू केली. तो प्रयागराजला येऊन दान करीत असे. जर भाजप सरकार राज्याच्या विकासाबाबत गंभीर असेल तर त्यांनी माझ्या सरकारच्या काळातील योजनांशिवाय कुठल्या योजना राबवल्या हे प्रामाणिकपणे

सांगावे.’ अखिलेश यांनी यंदाच्या कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नानही केले. ते म्हणाले की, ‘आमच्या राजवटीत मुस्लीम मंत्र्यांनी कुंभमेळ्याची चोख व्यवस्था केली होती. त्यात महंमद आझम खान, अहमद खान हे मंत्री तर जावेद उस्मानी हे अधिकारी यांचा समावेश होता भाजप मात्र जातीयतेवर समाजात फूट पाडत आहे.’