राज्यसभेत एकही सदस्य नसलेल्या आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकल्याबद्दल तृणमूल काँग्रेस व काँग्रेसने सरकारला जाब विचारला. ही तर अघोषित आणीबाणी आहे, अशा शब्दात तृणमूलच्या डेरेक ओ ब्रायन यांनी सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले.
गेल्या तीन आठवडय़ांपासून राज्यसभेत ठोस कामकाज झालेले नाही. हीच परिस्थिती मंगळवारीही कायम राहिली. कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी सभापतींच्या आसनासमोर येत घोषणाबाजी सुरू केली. हे सरकार एकीकडे संघराज्य पद्धतीवर बोलत असते. प्रत्यक्षात संघराज्य पद्धतच मोडीत निघण्याची भीती आता वाटू लागली असल्याची प्रतिक्रिया डेरेक ओ ब्रायन यांनी दिली. विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यावर संतप्त झालेले उपसभापती पी. जे. कुरियन यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विरोधकांचे हे वर्तन लोकशाहीविरोधी आहे. अनेक विधेयके प्रलंबित आहेत. परंतु त्याचे गांभीर्य नाही. काही जणांनी सभागृह जणू ताब्यातच घेतले आहे. तरीही वारंवार घोषणाबाजी थांबली नाही. कधी पंजाबमधील दलित हत्याकांड तर कधी सीबीआय कारवाईवरून ती सुरू होती. या गोंधळात उत्तर प्रदेशच्या स्थानिक मुद्दय़ांची भर पडली.

तुम्हाला रस का?
काँग्रेस विरोधाला संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जोरदार टोला लगावला. ‘काँग्रेस इज मेड फॉर करप्शन’, असे सुनावत, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत असताना त्यांना वाचविण्यात काँग्रेस खासदारांना इतका रस का, असा प्रश्न त्यांनी विचारला.