09 December 2019

News Flash

शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसे मोदींनी ‘टाटां’च्या नॅनोसाठी दिले : राहुल गांधी

भाजप हा गरीबविरोधी पक्ष

राहुल गांधी यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसे टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी दिल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांना मोदी सरकारविरोधात लिहायचंय पण त्यांना धमकावले जाते आणि मारहाण केली जाते, असा दावाही त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदींनी शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट पैसे टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी दिले, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसमधील पक्षांतर्गत नाराजीवर त्यांनी भाष्य केले. संघ आणि भाजपविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांनाच आम्ही निवडणुकीत तिकीट देणार, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये असूनही पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न केला तर त्यांना आमच्या पक्षात जागा नसेल, असा इशाराही त्यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना दिला.

देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले, देशात माध्यमांची गळचेपी होत आहे. सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या माध्यमांना धमकी दिली जाते. शेतकरी, छोटे व्यापारी आणि कामगार हे माध्यम चालवत नाही. तर मोदींचे तीन- चार मित्र माध्यमं चालवतात असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही सरकारला वस्तू आणि सेवाकरात (जीएसटी) चार टप्पे ठेवण्याऐवजी १८ टक्क्यांची मर्यादा ठेवा असे सांगितले होते. पण याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे गांधीनी म्हटले आहे.

गोरखपूरमधील रुग्णालयाच्या दुरवस्थेकडे मी वर्षभरापूर्वीच प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पण त्याची दखल घेतली नाही आणि ६० हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असून, भाजप हा गरीबविरोधी पक्ष आहे. भाजपला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण करायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. पण आम्ही खासगीकरण होऊ देणार नाही. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

First Published on September 4, 2017 5:13 pm

Web Title: congress vice president rahul gandhi campaign in ahmedabad bjp government narendra modi anti poor tata nano
Just Now!
X