गेल्या जवळपास सात-आठ महिन्यांपासून करोना रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त असलेल्या डॉक्टरांना काही काळ विश्रांती देता येईल का याबाबत विचार करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला केली. सातत्याने काम केल्याने डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

डॉक्टरांना काही काळ विश्रांती देता येईल का या सूचनेवर विचार करावा, असे न्या. अशोक भूषण, न्या. आर. एस. रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. गेल्या सात-आठ महिन्यांपासून डॉक्टर अविश्रांत काम करीत आहेत, त्यामुळे त्यांना विश्रांती देता येईल का या बाबतचा विचार करावा, कारण सातत्याने काम करणे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे ठरू शकते, असे पीठाने सांगितले.

करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काही काळ विश्रांती देता येईल का, या सूचनेचा सरकार निश्चितपणे विचार करील, असे मेहता यांनी पीठासमोर सांगितले.

देशातील करोनाबाधितांची संख्या ९९ लाखांहून अधिक

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत २२ हजार ०६५ जणांना करोनाची लागण झाली असून करोनाबाधितांची एकूण संख्या ९९ लाख सहा हजार १६५ वर पोहोचली आहे. तर करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्य़ांहून अधिक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

करोनामुळे गेल्या २४ तासांत ३५४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ४३ हजार ७०९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ९४ लाख २२ हजार ६३६ जण करोनातून बरे झाले आहेत.