नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांच्या सेवाभावी कार्यामागे इतरधर्मीय लोकांचे धर्मांतरण करून त्यांना ख्रिश्चन धर्मात सामावून घेण्याचा मुख्य उद्देश असल्याचे, खळबळजनक विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते सोमवारी भरतपूर येथे ‘अपना घर’ या ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
मदर तेरेसा यांचे सेवाभावी कार्य उत्तम होते. मात्र, त्यामागे इतर धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा उद्देश होता. ज्यांची सेवा केली जात असे, त्यांना ख्रिश्चन धर्माचा स्विकार करण्यास सांगितले जात असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले. धर्मांतराबद्दल आम्हाला कोणतीही आपत्ती नाही. मात्र, सेवाभावी कार्याच्या नावाखाली धर्मांतर होत असेल तर, करण्यात आलेले सेवाकार्य व्यर्थ ठरते, असे भागवत यांनी सांगितले. भागवत यांच्या या विधानामुळे धर्मांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.