कोविड १९ विषाणू संसर्गामुळे रुग्णांमध्ये मेंदूच्या काही भागांवर परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. करोना संसर्गामुळे रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या आरोग्यविषयक गुंतागुंतीच्या एकूण ८० अभ्यासांमध्ये हे उघड झाले आहे.

कोविड १९ विषाणूची मेंदू रोगविषयक लक्षणे शोधून काढण्यासाठी महत्त्वाची काही संशोधने झाली आहेत. ‘सिझर- युरोपियन जर्नल ऑफ एपिलेप्सी’ या नियतकालिकात म्हटले आहे की, गुंतागुंत निर्माण झालेल्या कोविड रुग्णांत ‘इइजी’ म्हणजे इलेक्ट्रोएन्सफलोग्राफ काढल्यानंतर काही अनियमितता दिसून आल्या. त्यातून मेंदूतील विद्युतीय क्रियाशीलतेवर परिणाम झालेला दिसून आला.

अमेरिकेतील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक झुल्फी हनीफ यांनी सांगितले की, किमान ६०० रुग्णांवर या प्रकारे मेंदूत अनियमितता दिसून आल्या.

काही रुग्णांचे इइजी काढण्यात आले असता त्यांच्या मेंदूने विद्युत संदेशाला कमी प्रतिसाद दिला, त्यानंतर त्यांच्या बोलण्यात दोष दिसला, ते गोंधळलेले दिसले. वेदनाशामक गोळ्या दिल्यानंतर उठताना त्यांच्यात काही अक्षमता दिसून आल्या. अनेक रुग्णांत अग्रखंडाच्या भागात (फ्रंटल लोब) अनियमित प्रमाणात विद्युत सक्रियता दिसून आली.

वृद्धांमध्ये जास्त हानी

वृद्ध पुरुषांमध्ये मेंदूची हानी होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोविड १९ मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे मेंदूत अनियमितता येऊन त्याचा इइजीवर परिणाम होतो. अधिक रुग्णांना इइजी व एमआरआय, सीटी स्कॅनची गरज आहे. त्यामुळे अग्रखंडावर झालेले परिणाम आणखी स्पष्टपणे समजतील असे हनीफ यांचे मत आहे. कोविड १९ संसर्गानंतर आपण बरे झालो म्हणजे सगळे आलबेल झाले असे समजणे चुकीचे आहे. कारण त्यामुळे मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत.