देशातील करोनाचा फैलाव मंदावला असून, दैनंदिन रुग्णआलेख घसरणीला लागला आहे. गेल्या २४ तासांत देशात १०,०६४ रुग्ण आढळले असून, गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णवाढ आहे. बाधितांचे प्रमाण साडेपाच टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

देशात ऑगस्ट, सप्टेंबर २०२० मध्ये करोना रुग्णसंख्येतील दैनंदिन वाढ वेगाने होत होती. सप्टेंबरमध्ये अनेकदा रोज एक लाखाच्या उंबरठय़ावर रुग्णनोंद होत होती. त्यावेळी करोना चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या बाधितांचे प्रमाण नऊ टक्क्यांहून अधिक होते. मात्र, हे प्रमाण हळूहळू घटत असून, आता ते ५.६३ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवडय़ाभरात देशात बाधितांचे प्रमाण १.९९ टक्के इतके नोंदले गेले होते. त्यामुळे नव्या बाधितांच्या प्रमाणात उत्तरोत्तर घट होत असताना एकूण बाधितांच्या प्रमाणातही सातत्यपूर्ण घट नोंदविण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या १,०५,८१,८३७ वर पोहोचली आहे. त्यातील १,०२,२८,७५३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्तांचे हे प्रमाण ९६.६६ टक्के आहे. देशातील दैनंदिन करोनाबळींमध्येही घट होत असून, गेल्या २४ तासांत १३७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरातील करोनाबळींची एकूण संख्या १,५२,५५६ वर पोहोचली आहे.

‘लशी सुरक्षित’ देशात आतापर्यंत साडेचार लाख करोनायोद्धय़ांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ०.१८ टक्के जणांवर प्रतिकूल परिणाम झाला. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून, भारतीय लशी सुरक्षित आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.