करोनामुळे यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकले जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत करोना साथीचा मोठय़ा प्रमाणात प्रसार होत असल्यामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या देशात करोनामुळे रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, असे असले तरी देशात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यातच दिल्लीत करोनाची साथ वाढत असून रुग्ण संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन घेणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलले जाऊ शकते. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान करोना तपासणी करून अधिवेशन घेण्यात आले होते. १८ नोव्हेंबरला सर्वपक्षीय बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात घेतले जाते. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होते आणि फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो.

करोनाच्या संकट काळात १४ सप्टेंबरपासून सुरू झालेले    पावसाळी अधिवेशन ८ दिवस आधीच संपण्यात आले होते. २४ सप्टेंबरला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. यावेळी कृषी कायद्यावरुन झालेल्या गोंधळामुळे आठ खासदारांना अधिवेशनासाठी निलंबीत करण्यात आले होते.       कृषी कायद्यावरुन काँग्रेसह विरोधी पक्षांची आंदोलन पुकारले होते. विशेष म्हणजे, कमी दिवसात विक्रमी काम या अधिवेशनात पार पडले होते.