करोनाची दुसरी लाट अजून संपली नसल्याचे काल आरोग्यमंत्रालयाने सांगितले. देशात काही राज्यात करोना वाढतोय. त्यांमुळे करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४२,६२५ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ३६,६६८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण ३,०९,३३,०२२ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के आहे. गेल्या २४ तासात ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या करोनाची ४,१०,३५३ सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीचे ४८.५२ कोटी डोस लोकांना देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत लोकांना लसीचे ६२ लाख ५३ हजार ७४१ डोस देण्यात आले आहेत.

देशातील १८ जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढतायत

देशातील काही राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर या प्रकरणातील तेजीमुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशभरात असे १८ जिल्हे आहेत, जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. यापैकी १० जिल्हे केवळ केरळमधील आहेत. तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील ५७ जिल्ह्यांमध्ये दररोज १०० रुग्ण आढळत आहेत. तसेच देशातील १८  जिल्ह्यांमध्ये करोनाची सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामध्ये केरळमधील १०, महाराष्ट्रातील ३, मणिपूरमधील २, अरुणाचल, मेघालय आणि मिझोरामच्या १-१ जिल्ह्यांचा समावेश आहे.