कोविड १९ वर एकूण ११ प्रायोगिक लशींवर सध्या जगात चाचण्या सुरू आहेत. त्यात भारतातील कोव्हॅक्सीन व झायकोव्ह डी या लशींचा समावेश आहे. पण, यातील कुठलीही लस २०२१ पूर्वी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे.

आयसीएमआरने (भारतीय वैद्यक संशोधन परिषद) मात्र शुक्रवारी असे म्हटले होते की, पंधरा ऑगस्ट रोजी करोनावरची स्वदेशी लस जारी केली जाईल. आयसीएमआरच्या त्या घोषणेवर टीकेची झोड उठल्यानंतर लशीच्या चाचण्यांत स्वयंसेवक ठरवणे व इतर प्रक्रियातील लालफितीचा कारभार टाळण्यासाठी रुग्णालये, कंपन्या व इतर संबंधित घटकांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती, असे स्पष्टीकरण या संस्थेने केले होते. असे असले तरी पंधरा ऑगस्टला स्वदेशी लस आणली जाईल या घोषणेवर त्यांनी स्पष्टपणे माघार घेतली नव्हती, पण रविवारी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने मात्र अशी लस निदान या वर्षी तरी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदी यांना विरोधकांवर राजकीय मात करण्याकरिता पंधरा ऑगस्टचा मुहूर्त साधून करोना लस जारी करता यावी यासाठी हा खटाटोप असल्याची टीका वैद्यकीय तज्ज्ञांनी केली होती. बिहारमध्ये यावर्षी निवडणुका आहेत त्यामुळेच मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली होती. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत असा इशारा दिला की, वैद्यकीय चाचण्या घाईने करून अशी लस आल्यास त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, एकूण सहा भारतीय कंपन्या कोविड १९ लशीवर काम करीत आहेत. त्यात कोव्हॅक्सीन व झायकोव्ह -डी या दोन लशी जवळपास तयार आहेत. जगात एकूण १४० लस घटकांपैकी ११ लशी मानवी चाचण्यांच्या पातळीवर आहेत. यापैकी कुठलीच लस २०२१ च्या आधी येण्याची शक्यता नाही.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, एझेडडी १२२२ ( ब्रिटिश कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेका) व एमआरएनए १२७३ (अमेरिकेतील मॉडर्ना) या लशींच्या निर्मितीसाठी काही भारतीय कंपन्यांशी करार झाले आहेत. त्या लशी टप्पा दोन व तीनच्या चाचण्यांत योग्य ठरल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यात सुरक्षेच्या चाचण्या होतात तर तिसऱ्या टप्प्यात कार्यक्षमतेच्या चाचण्या होतात. या चाचण्यांना काही महिने लागतात. लशींच्या चाचण्या वेगाने केल्या जाऊ शकतात, तरी आयसीएमआरने दिलेल्या पंधरा ऑगस्टच्या मर्यादेत कधीच होऊ शकत नाहीत.

हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन  व अहमदाबादच्या झायडसची  झायकोव्ह डी या लशींना टप्पा १ व २ च्या चाचण्यांना या आठवडय़ात औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. त्यात कोव्हॅक्सीनच्या  चाचण्या २८ दिवसांत पूर्ण करणे आयसीएमआरला अपेक्षित आहे. तरच ती लस १५ ऑगस्टला उपलब्ध होऊ शकेल. पण टप्पा २ व ३ च्या चाचण्या न करता  हे कसे होणार हे कोडे आहे.

भारत बायोटेक या लस निर्मात्या कंपनीच्या अर्जात म्हटले आहे की, वैद्यकीय चाचण्यांना १५ महिने लागतील. त्यानुसार ही लस येण्यास २०२१ हे वर्ष उजाडेल, हा हिशेब विज्ञान -तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विधानाशी जुळणारा आहे.

केरळमध्ये सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे वर्षभर पालन

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये करोनाचा फैलाव होत असल्याने राज्य सरकारने जनतेला सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे जवळपास वर्षभर पालन करण्याचे बंधन घातले आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन सरकारने त्यासाठी संबंधित अध्यादेशात आवश्यक ते बदल केले आहेत.

केरळ एपिडेमिक डिसिझ करोना व्हायरस डिसिझ (कोविड-१९) अतिरिक्त नियमन २०२० नुसार राज्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पुढील किमान वर्षभर अथवा सरकार पुढील आदेश देईपर्यंत काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे कटाक्षाने पालन केले जाईल याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.