बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता २७१५ झाली आहे. मंगळवारी आणखी ५२ जणांचा मृत्यू झाला. एकूण निश्चित रुग्णांची संख्या ७८०६४ झाली असून हुबेई प्रांतासह सर्वच ठिकाणी संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, हुबेई प्रांतात मंगळवारी ५२ जणांचा मृत्यू झाला असून ४०६ नवीन रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या २७१५ तर निश्चित रुग्णांची संख्या ७८०६४ झाली आहे. देशभरात एकू ण ४३९ नवीन रुग्ण असून मंगळवारी गंभीर रुग्णांची संख्या ३७४ ने कमी होऊन ती ८७५२ झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या आता २४९१ आहे. २९७४५ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवले जाणार आहे. ६.४७ लाख निकटचे संपर्क सापडले असून ७९००० लोक अजून निरीक्षणाखाली आहे. मंगळवार अखेरीस एकूण ८५ निश्चित रुग्णांसह २ मृत्यू अशी हाँगकाँगची स्थिती होती.

मकावमध्ये १० रुग्ण असून तैवान मध्ये ३१ रुग्ण व एक मृत्यू अशी स्थिती आहे. वुहान आणि हुबेईतील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे ही क्विंगहुआ यांनी सांगितले.

हुबेई प्रांतात मदत साहित्य पोहोचवण्यात येत आहे. हुबई व वुहानची एकूण लोकसंख्या ५ कोटी असून जानेवारीपासून तेथे बंदसदृश स्थिती आहे. सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद आहे. बीजिंग, झेजियांग व ग्वांगडाँग यांनी हुबेईतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी समन्वय सुरू केला आहे.

करोनाशी संपूर्ण जगाचा लढा

सेऊल : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी संपूर्ण जग लढा देत असून, शास्त्रज्ञ त्यावर उपचार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, तर अ‍ॅटलांटिकमधील एका किनाऱ्यावरील रिसॉर्टमधील लोकांना विलगीकरणासाठी पाठवण्यात आले.

कोविड-१९ नावाच्या या विषाणूचे संकट वेगाने वाढत असून कारखाने ठप्प पडले आहेत, व्यापारी मार्ग गोठले आहेत आणि पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. यामुळे या विषाणूच्या वाढत्या आर्थिक परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा ठरल्यानुसार होतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

जगभरातील सुमारे ८१ हजार लोकांना करोना विषाणूची लागण झाली असून, हा विषाणू नवनवे लक्ष्य शोधतोच आहे. युरोपमध्ये जर्मनी, फ्रान्स, स्पेन देशांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मध्यपूर्वेत बहारीन, कुवेत आणि इराकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना याचा दोष इराणला दिला जात आहे.