चीनमधील वुहान शहरामधील मांसविक्री केल्या जाणाऱ्या बाजारपेठेमधून प्रादुर्भाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. जगभरातील १८३ देशामध्ये करोनाचा विषाणू पसरला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने ३१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र असत असतानाच चीनमध्ये मात्र परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. म्हणूनच तेथील सरकारने आता मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठा पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा वटवाघूळ, कुत्रा, मांजरी, सशांचे मांस विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. या बाजारपेठा सुरु होताच येथे नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचेही वृत्त आहे. वटवाघूळ आणि खवल्या मांजराच्या मांसांमधून करोनाचे संक्रमण मानवामध्ये झाल्याचा अंदाज काही संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे संपूर्ण जग करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी लॉकडाउनच्या माध्यमातून घरी बसलेलं असताना दुसरीकडे चीनने मांसविक्री सुरु करण्याची पवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी चीनमधील मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठा सुरु करण्यात आल्या. या बाजारपेठांचे फोटो समोर आले आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यात यश आल्याने चीनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चीनमधील वेगवेगळ्या शहरांमधील मांस विक्रीच्या बाजारपेठा पुन्हा सुरु झाले आहेत, असं डेली मेलने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या बाजारपेठांमध्ये वटवाघूळ, कुत्री, मांजरी, ससे यांचबरोबर किड्यांची विक्री पुन्हा सुरु झाल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, चीनच्या नैऋत्यकडील गुझलीन शहरामधील मांसविक्रीची बाजारपेठ सुरु झाल्यानंतर तेथे हजारो ग्राहकांनी गर्दी केली. येथे अनेक जनावरांना पिंजऱ्यामध्ये बंद करुन विक्रीसाठी आणले जाते. अनेकांनी येथे कुत्र्याचे तसेच मांजरीचे मांस विकत घेतले.

तसेच दक्षिण चीनमधील डोंगगुआन येथील मांसविक्री करणाऱ्या बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. येथे असणाऱ्या पारंपारिक चीनमधील पारंपारिक औषधे विकणाऱ्या दुकानांबाहेर, ‘वटवाघूळ, विंचू यांच्या अवयवांपासून बनवण्यात आलेली औषधे उपलब्ध आहेत’ असे फलक लावण्यात आले आहेत.

करोनाचा संसर्ग ज्या वुहान शहरामधून सुरु झाला ते ही आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. सरकार तेथील एक एक सेवा टप्प्याटप्प्यात सुरु करत आहे. याच शहरातून पसलेल्या करोना विषाणूने वैश्विक महामारीचे स्वारुप धारण केलं आहे. शहरातील सर्वात गर्दीचे ठिकाण असणाऱ्या रेल्वे स्थानकामध्ये शनिवारपासून सामान्यपणे वर्दळ सुरु झाली आहे. राष्ट्रीय महामार्गही खुले करण्यात आले आहे. हुबेई प्रांतात असणाऱ्या वुहानबरोबरच संपूर्ण प्रांतातील पाच कोटी लोकसंख्येला लॉकडाउनदरम्यान घरीच बसण्याचे आदेश देण्यात आले होते. एकेकाळी वुहानमध्ये करोनाचा संसर्ग झालेले हजारो रुग्ण अढळून येत होते. आता मात्र येथे नव्याने अढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.