जगभरातील १९० हून अधिक देशांमध्ये कोरनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगभरातील दहा लाखांहून अधिक जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. याच लॉकडाउनमुळे जगभरातील अनेक देशांमधील सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारखाने, कंपन्या बंद आहेत. याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणावर झाल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे करोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतानाच दुसरीकडे करोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाउन हे पर्यावरणासाठी आणि निसर्गासाठी वरदानच ठरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मागील सात दशकांमध्ये पृथ्वीवरील हवा पहिल्यांदाच इतकी स्वच्छ झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यापूर्वी दुसऱ्या महायुद्धानंतर इतकी शुद्ध हवा पृथ्वीवर होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर मागील सात दशकांमध्ये पहिल्यांदात पृथ्वीवरील कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. लॉकडाउनमुळे जगभरातील अनेक प्रमुख देशांमधील कंपन्या आणि वस्तूंचे उत्पादन काही मर्यादित काळासाठी थांबवण्यात आल्याने हा परिणाम दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ग्लोबर कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचा दावा केला आहे. “कार्बन उत्सर्जनामध्ये पाच टक्के घट झाली आहे. या आधी अशी घट २००८ च्या आर्थिक मंदीच्या काळात दिसून आली होती. त्यावेळी अनेक कंपन्या बंद पडल्याने कार्बन उत्सर्जन १.४ टक्क्यांनी कमी झालं होतं. त्याआधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अनेक देशांमधील वेगवगेळ्या वस्तूंचे उत्पादन घेणारे कारखाने, बाजारपेठा, वाहतूक, व्यापार पूर्णपणे बंद होता. त्यामुळेच प्रदुषणामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली होती. त्यानंतर आज हे चित्र पहायला मिळत आहे,” असं कॅलिफोर्नियामधील स्टॅण्डफर्ड विद्यापिठातील अर्थ सिस्टीम सायन्सचे प्राध्यापक असणाऱ्या रॉब यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.

वातावरणावर होणारे दुष्परिणाम थांबवण्यासाठी सन २०२० पासून कार्बनचे उत्सर्जन थांबवणे गरजेचे असल्याचे संशोधकांचे म्हणणे होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या माध्यमातून हे साध्य होताना दिसत आहे. मात्र ही परिस्थिती लॉकडाउननंतर कायम राहण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या जरी पृथ्वीवर शुद्ध हवा असली तरी लॉकडाउनची बंदी उठवल्यानंतर परिस्थिती जैसे थे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रकाशित केलेल्या एका अङवालानुसार दर वर्षी कार्बन उत्सर्जनामध्ये ७.६ टक्क्यांची घसरण झाली तरच जागतिक तापमान वाढ १.५ डीग्री सेल्सियसने कमी करता येईल असं म्हटलं होतं. सध्या जरी लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जन मोठ्याप्रमाणात कमी झालं असलं तरी २०२१ च्या सुरुवातीपासून पुन्हा ते वाढू शकतं अशी शंका संशोधकांनी व्यक्त केली आहे.