News Flash

करोनाचा कहर! अवघ्या २४ तासांत साडेतीन हजार जणांनी गमावले प्राण

देशात तीन लाख ८६ हजार ४५२ नवीन रुग्णांची भर

हे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलं आहे. (अभिनव साहा। इंडियन एक्स्प्रेस)

भयावह… भयंकर… ह्रदयद्रावक… या शब्दातही न मावणारी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. करोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. देशात मृत्यूचं तांडवच सुरू असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा लागलेल्या दिसत आहेत. करोनाचं थैमान कायम असल्याचंच गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून दिसत आहे. देशात अवघ्या २४ तासांत साडेतीन हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज देशातील मागील २४ तासांतील रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जाते. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशवासीयांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात दररोज होणार ५,००० मृत्यू?

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने काळजाचा ठोका चुकवणारा इशारा दिला आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून, अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. करोनाच्या आपत्तीमुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल, असा इशारा इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासाच्या आधारे दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 9:45 am

Web Title: coronavirus crisis in india highest covid death india reports 3 86 452 new covid19 cases bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमेरिकेकडून भारतात मदत दाखल; बायडन यांनी दिलेला शब्द पाळला
2 ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू
3 मनमोहन सिंग यांची करोनावर मात; AIIMS मधून मिळाला डिस्चार्ज
Just Now!
X