राजधानी दिल्लीमध्ये असलेलं केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात ‘सीआरपीएफ’चं मुख्यालय सील करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सचिवाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर रविवारी तातडीनं कार्यालय सील करण्यात आलं. करोनाग्रस्त अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.

भारतातील सर्वात मोठं निमलष्करी दल असून, सीआरपीएफच्या विशेष महासंचालक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्सनल सेक्रेटरीला करोनाची लागणं झाल्याचं रविवारी समोर आलं. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं सीआरपीएफचं कार्यालय सील करण्याची कार्यवाही हाती घेतलं. लोधी रोडवरील सीजीओ संकुलात असलेलं मुख्यालय सील करण्यात आलं असून, सीआरपीएफच्या जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्यांना वैद्यकीय नियमावलीनुसार प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. करोनाग्रस्त अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे. ४० जणांना क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सध्या देशभर कर्तव्यावर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना करोनाची लागण झाल्याची अनेक प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रातही करोनाचा संसर्ग झालेल्या जवानांची संख्या मोठी आहे. हिंगोली जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना करोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी सहा जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. सहा जवानांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना याआधीच करोना झालेला आहे. या सगळ्यांना सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेलं आहे.