X
X

करोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची मोठी योजना, सांगितला 5T प्लान

READ IN APP

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली सरकार एका विशेष योजनेवर काम करत आहे

राजधानी दिल्लीत करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकार काय पावलं उचलत आहे याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एका विशेष योजनेवर काम करत आहे ज्याला त्यांनी 5T असं नाव दिलं आहे. यामध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीमवर्क आणि ट्रॅकिंग अॅण्ड मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ३० हजार रुग्णांची संख्या झाली तरी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. सध्या दिल्लीत करोनाचे ५०० रुग्ण आहेत. केजरीवाल यांनी डॉक्टर, नर्स यांचा लढाईतील सैनिक असा उल्लेख करताना शेजाऱ्यांना त्यांना योग्य वागणूक देण्यास सांगितलं आहे.

आपल्याला करोनाच्या तीन पाऊलं पुढे राहणं गरजेचं आहे. जर आपण झोपून राहिलो तर करोनावर नियंत्रण आणू शकत नाही असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी 5T चा अर्थही सांगितला. तुम्हीदेखील जाणून घ्या….

टेस्टिंग: केजरीवाल यांनी सांगितलं की, जर टेस्टिंग झाली नाही तर किती घरांमध्य करोना आहे हे कळणार नाही. त्यामुळे टेस्टिंग अत्यंत गरजेचं आहे. यावेळी त्यांनी दक्षिण कोरियाचं उदाहरण देत तिथे मोठ्या प्रमाणात तपासणी करत ज्यांना करोनाची लागण झाली आहे अशा लोकांची माहिती मिळवली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी एक लाख रॅपिड टेस्टसाठी ऑर्डर देण्यात आली असून, लवकरच सुरुवात होईल असं सांगितलं. यामध्ये हॉटस्पॉट ज्याप्रमाणे मरकज, दिलशाद गार्डन यांचा समावेश असेल.

ट्रेसिंगः पुढील टप्प्यात ट्रेसिंगचं काम होत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णाने १४ दिवसांमध्ये कोणाची भेट घेतली याची माहिती घेऊन त्यांना ट्रेस केलं जाईल. त्यांनी १४ दिवस घरात क्वारंटाइन होण्यासाठी सांगण्यात येईल अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. दिल्लीत सध्या ट्रेसिंग योग्य पद्दतीने सुरु असल्याचं ते म्हणाले. यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. केजरीवाल यांनी सांगितलं की, क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या २७ हजार ७०२ लोकांचा नंबर पोलिसांना देण्यात आला आहे. जेणेकरुन अशा लोकांवर नजर ठेवली जाईल. त्याच्या मोबाइलच्या सहाय्याने  घरात आहेत की नाही याची माहिती मिळेल.

ट्रीटमेंट: अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे की, करोनाबाधितांच्या उपचारासाठी २४५० सरकारी बेड, ४०० खासगी रुग्णालयं आरक्षित ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मॅक्स, अपोलो, गंगाराम या रुग्णालयांचा समावेश आहे. एकूण २९५० बेड आहेत. पण जर रुग्णांची संख्या तीन हजाराच्या पुढे  गेली तर जीटीबी रुग्णालयही त्यासाठी तयार करण्यात येणार आहे. तिथे १५०० बेडची व्यवस्था आहे. जर दिल्लीत करोनाचे ३० हजार रुग्ण झाले तर हॉटेल, धर्मशाला यांचा ताबा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडून २७ हजार पीपीई किट्स येणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

टीम वर्क: कोणतीही एकटी व्यक्ती करोनावर मात करु शकत नाही. आज केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून काम करत आहे जी चांगली गोष्ट आहे. केजरीवाल यांनी यावेळी सर्व राज्य सरकारांनी एकमेकांकडून शिकलं पाहिजे. इतर राज्यांमध्ये काय चांगल्या गोष्टी सुरु आहेत याची माहिती घेतली पाहिजे. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि नर्स या लढाईमधील मुख्य सैनिक असून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. त्यांना वाईट वागणूक दिल्यास सहन केलं जाऊ शकत नाही असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

ट्रॅकिंग अॅण्ड मॉनिटरिंग: पहिल्या चारही गोष्टी व्यवस्थित सुरु आहेत की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांनी घेतली आहे. सर्व योजनेची व्यवस्थित अमलबजावणी सुरु आहे की नाही यावर २४ तास नदर असणार आहे असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

20
X