भारतामधील करोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील काही दिवसांपासून रोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरु झालाय. अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. असं असतानाच माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलने भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> Coronavirus: US, UK, रशिया, ऑस्ट्रेलिया, सौदी, चीनसहीत एकूण १० देश भारताला मदत करण्यास तयार

“भारतामधील करोनासंदर्भातील चिंताजनक परिस्थिती पाहून धक्का बसला आहे. गुगल आणि गुगलमधील सर्वजण भारताला १३५ कोटींची मदत करणार आहेत. युनिसेफच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोनासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे,” असं पिचाई यांनी स्पष्ट केलं आहे.

१० देशांनी केली मदतीसंदर्भातील घोषणा…

करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिलं आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या करोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचं आणि शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.