भारताने २४ औषधं आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवले आहेत. सरकारक़डून ही माहिती देण्यात आली आहे. भारत जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयावरुन इशारा दिला होता. करोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर मागच्या महिन्यात काही औषधांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

पॅरासीटेमोल औषधांच्या निर्यतीवर निर्बंध कायम आहेत. भारताने तडकाफड़की हे निर्बंध का उठवलेत? हे स्पष्ट झालेले नाही. पण यामागे अमेरिकेचा दबाव आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले. शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती.

औषध पुरवठयाच्या साखळीमध्ये कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे दोन्ही नेत्यांमध्ये ठरले आहे. व्हाइट हाउसचे प्रवक्त्यांनी शनिवारी टि्वट करुन ही माहिती दिली होती. भारताने टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य सुरक्षा उपकरणे यांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.

करोना व्हायरसच्या उपचारांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या गोळया प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी शनिवारी मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली, त्यावेळी या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती केली होती. पण सोमवारी वॉशिंग्टनमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन गोळयांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले नाहीत तर, जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली.