अमेरिकेत करोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. करोनाची लागण झालेल्यांमध्ये अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. यामधील अनेकांचा मृत्यूही झाला आहे. नुकताच न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशााचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. भारत-अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यात ब्रह्म कांचीबोटला यांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर दुख: झालं. भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे ते नेहमी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत माझी सहानुभूती आहे. ओम शांती”. ब्रह्म कांचीबोटला हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे माजी सहकारी होते. सोमवारी रात्री न्यूयॉर्कमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

अमेरिकेतील अनेक भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. मात्र त्याची नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही. ज्या दोन राज्यांमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे तिथे करोनाचा सर्वात जास्त प्रभाव पहायला मिळत आहे. सोमवारी या दोन राज्यांमधील १ लाख ७० हजार जणांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. तसंच ५७०० जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत चालू आठवडा हा अत्यंत घातक ठरणार असून ९/११ हल्ला किंवा पर्ल हार्बर बॉम्ब हल्ल्यापेक्षाही भीषण स्थिती ओढवणार आहे, असे मत एका वरिष्ठ डॉक्टरने व्यक्त केलं आहे. अमेरिकेत करोनामुळे ९६२४ बळी गेले आहेत, तर ३३६९०६ बाधित रुग्ण आहेत. या परिस्थितीतही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रमुख ठिकाणी करोना बळींची संख्या आता स्थिरावत चालल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे महा शल्यविशारद व्हाइस अ‍ॅडमिरल जेरोम अ‍ॅडम्स यांनी सांगितले, की करोनामुळे अमेरिकेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील ९/११ हल्ला व पर्ल हार्बरचा हल्ला या दोन  भीषण घटना होत्या तसेच काहीसे आता घडत आहे. पुढील आठवडय़ात अमेरिका पुन्हा पर्ल हार्बर किंवा ९/११ क्षण अनुभवणार आहे. ९/११ हल्ल्यात २००१ मध्ये २९७७ लोक मारले गेले होते तर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला त्यात दुसऱ्या महायुद्धावेळी २४०० लोक मारले गेले होते.

व्हाइट हाऊसच्या करोना दलाने १ ते २ लाख लोक करोनाने मरतील अशी शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेतील एकूण ३३ कोटी लोकांसंख्येपैकी ९५ टक्के  नागरिक सध्या घरात आहेत.