औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसंच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली आहे. जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “औरंगाबादमध्ये रेल्वे अपघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे आपण दु:खी आहोत. मी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासोबत चर्चा केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शक्य ती सर्व मदत दिली जाणार आहे”.

दरम्यान लोको पायलटने ट्रॅकवर कामगारांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दुर्घटना घडली अशी माहिती रेल्वेने दिली आहे. “कामगारांना ट्रॅकवर पाहिल्यानंतर लोको पायलटने मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान दुर्घटना घडली. जखमींना औरंगाबाद सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मजुरांची नावे आणि अपघाताचे इतर तपशील अद्याप समजू शकलेले नाही.