पंजाबमधील पटियाला शहरात निहंगा समुदायातील एका टोळक्यानं भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्यानंतर धिंगाना घातला. बेफाम कार चालवत बॅरिकेट्स तोडले. त्याचबरोबर त्यांना रोखणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. यात सहायक पोलीस निरीक्षकाचा तलवारीने हातच तोडला. या घटनेनं पटियालामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, हात तुटून पडल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांनं हिंमत सोडली नाही. त्यानं तुटलेला हात उचलून घेतला आणि गाडीवर बसत हॉस्पिटलला चला असं म्हणाला.

लॉकडाउन असल्यानं सहायक पोलीस निरीक्षक पटियाला शहरात कर्तव्यावर होते. शहरात शांतता असताना विनाकारण फिरणाऱ्या एका टोळक्यानं पटियाला भाजी मंडई शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी रोखले. मात्र, टोळक्यानं बेफाम गाडी चालवत बॅरिकेट्स तोडले. बॅरिकेट्स तोडून आत आलेल्या या निहंगा टोळक्याला पोलिसांनी अडवले. यावेळी त्यांच्याकडे कर्फ्यू पासची मागणी पोलिसांनी केली. त्यानंतर भडकलेल्या या टोळक्यानं तलवारीनं पोलिसांवर हल्ला केला. यात सहायक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हातच हल्लेखोरांनी तलवारीनं कापला.

त्यानंतर हल्लेखोर फरार झाले, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हात उचलून घेत हरजीत सिंह हे स्कूटरवर बसले. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. मात्र, तुटलेला हात घेऊन हरजीत सिंह हॉस्पिटलमध्ये चला इतकंच म्हणाले. त्यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना चंदीगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

बलबेरा गुरूद्वारात चकमक –

हल्ला केल्यानंतर निहंगा टोळकं जवळच असलेल्या बलबेरा येथील गुरूद्वारात शिरले. त्यांचा पाठलाग करत पोलीस पोहोचले. यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. या हल्लेखोरावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी हल्लेखारांविरूद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.