लॉकडाउनच्या कालावधीमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील एका व्यक्तीला चक्क तिसऱ्यांदा क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमावरुन परतल्यानंतर या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर ही व्यक्ती तिच्या पहिल्या पत्नीच्या घरी गेली. काही दिवस तिथे राहिल्यानंतर या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहचल्यानंतर या व्यक्तीला पुन्हा क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मागील महिन्याभराच्या कालावधीमध्ये या व्यक्तीला दोन वेळा १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लॉकडाउन असतानाही या व्यक्तीने कायकुलम ते नीलांबुर आणि पुन्हा निलांबुर ते कायकुलम असा प्रवास केल्याचे उघड झालं आहे. या दोन्ही ठिकाणांमधील अंतर २८० किमीहून अधिक आहे. या व्यक्तीची दोन लग्न झाली असून त्याची एक पत्नी कायकुलम येथे राहते तर दुसरी निलांबुर येथे. दोन्ही पत्नींना भेटण्यासाठी या व्यक्तीने लॉकडाउनचे नियम मोडून प्रवास केला. या प्रकरणी आता कायाकुलम पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त, टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

नीलांबुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती दिल्लीमधील तबलिगींच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिथून आल्यानंतर या व्यक्तीला १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. क्वारंटाइनचा कालावधी २० एप्रिल रोजी संपल्यानंतर ही व्यक्ती दुसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी नीलांबुर येथे दाखल झाली. यासंदर्भातील माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या सूचना केल्या.

मात्र क्वारंटाइनमध्ये राहण्याऐवजी या व्यक्तीने लॉकडाउनचा नियम मोडून पुन्हा कायाकुलमला जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दुसऱ्यांदा क्वारंटाइनला १४ दिवस पूर्ण होण्याआधीच ही व्यक्ती कायाकुलमला पोहचली. पती लॉकडाउनच्या कालावधीमध्ये प्रवास करुन परत आल्यामुळे पत्नीचे त्याच्याबरोबर भांडण झालं. हा सर्व गोंधळ होईपर्यंत त्याच्या पहिल्या पत्नीला दुसऱ्या पत्नीबद्दल काहीच माहिती नव्हतं.

पत्नीबरोबरचा वाद विकोपाला गेल्यानंतर या व्यक्तीने तिच्यावरुद्ध पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पत्नीविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी गेला असता या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यावेळी या व्यक्तींने लॉकडाउनबरोबरच क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी या व्यक्तीविरोधतच गुन्हा दाखल केला असून त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या सूचना केल्या आहेत.