सध्या करोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मध्ये प्रदेशात कपडा व्यवसायिकांनी बाजारात नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा मास्क आणला आहे. या मास्कला मोठ्या प्रमाणात लोकांकडून मागणी येत आहे. विशेष म्हणजे मास्क खरेदी करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कमलनाथ यांचे पर्यायही उपलब्ध आहेत.

“मी आतापर्यंत ५०० ते १००० मोदी मास्क विकले असून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मास्कही लोकांच्या पसंतीस पडत आहे. याशिवाय राहुल गांधी, कमलनाथ यांच्या चेहऱ्याचे मास्कही आम्ही ठेवले आहेत,” अशी माहिती कुणाल परियाने यांनी दिली आहे. मोदींच्या मास्कला तुफान मागणी असून लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले आहेत.

करोनापासून संरक्षण करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसोबत मास्क वापरणंही अनिवार्य असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. करोनाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. मध्य प्रदेशाता आतापर्यंत करोनाचे ११ हजार रुग्ण सापडले असून ४६५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.