हरियाणामधील एका रुग्णालयामध्ये एक करोनाबाधित रुग्ण पीपीई कीट घालून पळाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या व्यक्तीला नंतर पोलिसांनी अटक केली आहे. पीपीई कीट (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट) घातल्यामुळे या रुग्णाला कोणीही थांबवलं नाही. मात्र नंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर यंत्रणांचा एकच गोंधळ उडला. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

करोनाग्रस्तांवर उपचार करताना डॉक्टर, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी जे पीपीई कीट वापरतात ते घालून एक करोनाबाधित आरोपी करोना वॉर्डच्या बाहेर पडला. पीपीई कीट असल्याने हा रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे वाटल्याने कोणीही त्याला आडवले नाही. याचाच फायदा घेत हा रुग्ण रुग्णालयामधून पसार झाला. “हा आरोपी करोनाबाधित असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर आम्ही सुरक्षा काढून घेतली. मात्र या आरोपीने पीपीई कीट घालून रुग्णालयामधून पळ काढला,” अशी माहिती पोलीस उप अधीक्षक धरमबीर सिंग यांनी एएनआयशी बोलताना दिली.

या प्रकरणात पोलिसांनी रुग्णालयामधील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यामध्ये हा आरोपी पीपीई कीट घालून रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील कॉरीडोअरमधून जातना दिसत आहे. या आरोपीने पीपीई कीट घालून रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका खिडकीतून खाली उडी मारल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.