पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी सायंकाळी देशाला संबोधित करताना २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. या काळामध्ये सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग व्यवसाय बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आलं. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. मोदींनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांनी चालत आपल्या राज्यात जाण्यास सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय महामार्गांवरुन चालत हजारो कामगार आपल्या राज्याकडे जायला निघाले. मात्र पुन्हा एकदा मोदींनी आहे तेथेच थांबवण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केलं. अनेक राज्यांमध्ये तेथील सरकारने या नागरिकांच्या अन्नाची आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. त्यामुळे या नागरिकांनी उपासमार झाली नाही. मात्र असं असतानाही अनेक ठिकाणी आजही या स्थलांतरित कामगारांना अन्न पुरवठा करताना स्थानिक प्रशासनाची तारेवरची कसरत होताना दिसत आहे. तरी प्रत्येक शहरामधील स्थानिक नगरपालिका आणि प्रशासकीय संस्था या नागरिकांच्या जेवणाची आणि निवाऱ्याची सोय करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक सेवाभावी संस्थांच्या मदतीने देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील शहरांमध्ये या नागरिकांच्या जेवणाची सोय केली जात आहे. काही ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना अन्न पुरवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले असून त्यावर कॉल करुन मोफत अन्न मागवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र राजस्थानमधील रायपूरमध्ये या सुविधेचा गैरफायदा सक्षम आणि स्थानिक लोकच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील काही स्थानिक लोक स्थलांतरित कामगारांना जेवण पुरवणाऱ्या हेल्प लाइन क्रमांकावर फोन करुन जेवणाची पाकिटं मागवत आहेत. हे असं करण्यामागील मुख्य कारण म्हणजे घरामध्ये नोकरदार वर्ग नसल्याने जेवण बनवायचा कंटाळा स्थानिकांना असल्याचे समजते.

रायपूर नगरपालिकेच्यावतीने पुरवण्यात येणाऱ्या या जेवणाच्या पाकिटांची मागणी श्रीमंत लोकांकडूनही होत असल्याचे मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. येथील १० ते १५ लोक पालिकेच्या हेल्पलाइनवर फोन करुन जेवणाच्या पाकिटांची मागणी करत आहेत. फोन करणारे लोक हे सधन कुटुंबातील असून त्यांच्यकडे घरं, गाडी आणि इतर सर्व सोयीसुविधा आहेत. राजस्थान पत्रिका या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका ठिकाणी अन्नाची पाकिटे घेऊन गेलेल्या स्वयंसेवकांना फोन करणाऱ्या व्यक्ती या श्रीमंत असल्याचे अढळून आले. घरी जेवण करण्याचा कंटाळा असल्याने हे लोकं फोन करुन तयार जेवण मागवत असल्याचे या स्वयंसेवकांना दिसून आलं. “स्वयंसेवकांनी या नागरिकांना जेवणाची पाकिटे दिली. ही सुविधा स्थलांतरित कामगारांसाठी आणि गरिबांसाठी असल्याने यापुढे अशाप्रकारे फोन करुन फसवणूक करु नये अशी विनंती या लोकांना स्वयंसेवकांनी केली केली,” असंही या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

अनेक लोकं हे गरीब असल्याचं सांगून तयार जेवणाची पाकिटे मागवत असल्याची अनेक प्रकरणे समोर आल्याची कबुली रायपूर स्मार्ट सीटीचे जनसंपर्क अधिकारी असणाऱ्या आशिष मिश्रा यांनी राजस्थान पत्रिकाशी बोलताना दिली. लॉकडाउनमुळे स्वयंपाक करणारे नोकर घरी येऊ शकत नसल्याने आम्ही जेवण मागवत असल्याचं कारण या कुटुंबाकडून दिलं जातं. तर काही जण आपल्या घरातील व्यक्ती आजारी असल्याने जेवण बनवण्यास वेळ मिळत नसल्याचे कारण देत असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus rich families in rajasthan are ordering food packets meant for poor because they dont want to cook scsg
First published on: 08-04-2020 at 16:46 IST