देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून तो रोखण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर मात करण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. भारतात इतर देशांपेक्षा वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा सरकारनं वेगळी पावलं उचलायला हवीत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या संकटसमयी आम्ही सरकारच्यासोबत आहोत. सरकारसोबत राहून आम्ही या आव्हानाचा सामना करु, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

गरिबांवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करा

राहुल गांधी म्हणतात, देशात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याऐवजी गरिबांच्या हिताची काही पावलं उचलायला हवीत. कारण, लॉकडाऊननंतरच देशातील सर्वच भागातील गरिबांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत. शनिवारी संध्याकाळी तर दिल्लीतील आनंद विहार येथे आपल्या घरी परतणाऱ्या मजूर-कामगार लोकांची गर्दी उसळली होती. यापूर्वी दिल्ली-गाजियाबाद सीमेवर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. जे आपल्या घरी पायीच निघाले होते.

आपले लोक, आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

राहुल गांधी पत्रात म्हणतात, मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच लोकांवर, आपल्याच समाजावर आणि आपल्याच अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे आपल्याला इतर देशांपेक्षा वेगळ्या पद्धतीचं पावलं उचलणं गरजेची आहेत.

संपूर्ण लॉकडाऊनमुळे वाढेत मृतांचा आकडा

आपल्या देशात गरिबांची संख्या मोठी आहे. जे रोजच्या कमाईवर अवलंबून असतात. संपूर्णपणे लॉकडाऊन केल्यामुळे या आजाराचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढेल. आपली प्राथमिकता ही असायला हवी की आपण वृद्ध आणि अशा लोकांना आधी आयसोलेट करायलं हवं जे लवकर करोना विषाणूच्या भक्षस्थानी येऊ शकतात. तसेच तरुणांना एकमेकांजवळ आल्यामुळे होणाऱ्या संकटाबाबत समजवावे.

ग्रामीण भागात वेगानं होणार फैलाव

राहुल गांधींनी पुढे म्हटलं की, भारतात करोडो लोक ग्रामीण भागात राहतात. पूर्णपणे लॉकडाऊन केल्याने शहरांमध्ये काम करणारे लोक गावांकडे पळ काढतील. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये या आजाराची लागण होण्याची आणि वेगाने पसरण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक लोकांचा जीव जाऊ शकतो.