करोना व्हायरससंबंधी जगभरात संशोधन सुरु आहे. दरम्यान एका नव्या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, करोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगपेक्षाही मास्क जास्त महत्त्वाची भूमिका निभावत आहे. अमेरिकेतील द प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. यानुसार, करोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी जर मास्कचा वापर केला गेला नसता तर आज करोना रुग्णांची संख्या खूप मोठी असती असा दावा करण्यात आला आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

अमेरिका आणि इटलीमधील रुग्णांची संख्या झाली कमी
संशोधनात सांगण्यात आलं आहे की, अमेरिका आणि इटलीमधील लोकांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर संक्रमण झालेल्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. एका संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कमधील नागरिकांनी मास्कचा वापर करण्यावर भर दिला होता. यामुळे संक्रमण दरात तीन टक्क्यांची घट झाली होती.

आणखी वाचा- सर्दीचा त्रास असणाऱ्यांना १७ वर्षांपर्यंत करोना संसर्गाचा धोका नाही; संशोधकांचा दावा

संशोधनानुसार, करोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर यांच्यापेक्षाही मास्कचा वापर करणं सर्वात जास्त फायदेशीर ठरत आहे. लोकांनी योग्य मास्कचा वापर केला तर करोनाची लागण होण्याचा धोका फार कमी असतो असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन केलं असून फार गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका अशी सूचनाही यावेळी कऱण्यात आली आहे.

आणखी वाचा- नकोसा विक्रम! २४ तासांत ११ हजारांचा टप्पा प्रथमच पार, एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे

टीकेनंतर WHO ने बदलली गाइडलाइन
जागतिक आरोग्य संघटनेने मास्कसंबंधी काही महत्त्वाचे निर्देश दिले होते. ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाऊ शकत नाही तिथे मास्क घातला जावा असं त्यांनी सांगितलं होतं. पण टीकेनंतर त्यांनी आपल्या गाइडलाइनमध्ये बदल केला असून मास्क कोणी आणि कोणत्या परिस्थितीत घातला पाहिजे यासंबंधी नवे निर्देश दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने चुकीची माहिती दिल्यानेच जगभरात करोनाचा वेगाने फैलाव झाल्याचा आरोप केला जात आहे.