देशभरात करोनाच्या तावडीत सापडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे बळी गेल्याच्या बातम्या येत असताना केरळमधून एक चांगली बातमी आली आहे. वयाची नव्वदी पार केलेल्या एका दाम्पत्यानं करोनाशी यशस्वी लढा दिला आहे. विशेष म्हणजे अनेक व्याधींनी ग्रासलेलं असताना हे दाम्पत्य याचा कसा सामना करु शकेल याबाबत डॉक्टरांच्या मनातही शंका होती. त्यामुळेच ही एक आश्चर्यकारक घटना मानली जात आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

थॉमस (वय ९३) आणि मरियम्मा (वय ८८) असं करोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. अनेक वर्षांपासून या दोघांनाही विविध व्याधींनी ग्रासलं आहे. त्यातच त्यांना करोनाची लागण झाली. या दोघांवरही कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते. आता ते व्यवस्थित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रेम आणि काळजी पाहून हे दाम्पत्यही भावूक झालं होतं.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थॉमस यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तर मरियम्मा यांना जंतू संसर्ग झाला होता. तसेच या दोघांचा उपचार करणाऱ्या एका नर्सची चाचणी देखील करोना पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, या दाम्पत्याच्या कुटुंबातील मुलगा, सून, नातू आणि इतर दोन नातेवाईकांना देखील चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दाम्पत्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

या दाम्पत्याचा मुलगा आपली पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून केरळमधील आपल्या पठानमथिट्टा येथील ऐथला या गावी आले होते. या तिघांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांच्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनाही याची लागण झाली होती.

दरम्यान, या दाम्पत्याच्या मुलावर केरळच्या आरोग्य विभागाने कडक शब्दांत सुनावले होते. कारण कोची येथील विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची तपासणी करुन घेतली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती. त्यांनी सोशल डिस्टंसिंगचंही पालन केलं नव्हतं. त्याचबरोबर इटलीहून भारतात आल्यानंतर त्यांनी केरळमधील अनेक कार्यक्रमांना हजेरी देखील लावली होती. ते पोस्ट ऑफिस, बँक आणि पोलीस स्टेशनला देखील गेले होते. या काळात त्यांच्या कुटुंबियांशी तब्बल ९०० लोक संपर्कात आले होते. या सर्वांनाच आरोग्य विभागाने क्वारंटाइन केलं आहे.