संपूर्ण जग करोनाविरोधात लढा देत असताना सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी घटना घडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना विषाणूच्या प्रसारावरून जागतिक आरोग्य संघटनेकडे बोट दाखवत मोठा निर्णय घेतला आहे. करोना विषाणू्च्या प्रसाराला जागतिक आरोग्य संघटनेनं गांभीर्यानं घेतलं नाही, असं सांगत अमेरिकेकडून दिला जाणारा निधी रोखला आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून, जागतिक आरोग्य संघटनेबरोबर संयुक्त राष्ट्र संघानं यांचा विरोध केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाच्या विषाणूला जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. “चीनमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं पुरेसे प्रयत्न केले नाहीत. उपाययोजना करण्यात संघटना अपयशी ठरली. प्राथमिक कर्तव्य पार पाडण्यात आरोग्य संघटना अपयशी झाली आहे आणि करोनाच्या प्रसाराला संघटनाच जबाबदार आहे,’ असा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यानंतर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी थांबवत आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेच्या निर्णयावर जगातील अनेक राष्ट्रांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

अमेरिकेनं घेतलेल्या निर्णयाचा जागतिक आरोग्य संघटनेनं निषेध केला. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव अँटोनियो गुटेरस याविषयी बोलताना म्हणाले, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा आहे. आरोग्य संघटना असो किंवा सामाजिक स्तरावर मदत करणाऱ्या संघटनांचा निधी कमी करण्याची ही वेळ नाही. करोनाविरोधात संघटना लढत असताना मदत करण्याची गरज आहे. या विषयावर राजकारण केल्यास केवळ मृतांचा आकडा वाढेल, असं संघटनेनं म्हटलं आहे.