ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक बिलीयन डॉलर (अंदाजे ७ हजार ६२० कोटी) मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. डॉर्सी यांनी यासाठी स्क्वेअर इन, या कंपनीमधील त्यांची मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. डॉर्सी हे स्क्वेअरचे सहसंस्थापक असून सध्या तेच कंपनीचे नेतृत्व करत आहेत. ही कंपनी डिजीटल पेमेंट क्षेत्राशी संबंधित काम करते.

डॉर्सी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच ही माहिती दिली आहे. आपल्या एकूण संपत्तीपैकी २८ टक्के वाटा हा करोनाविरुद्धच्या लढाईसाठी दान करणार असल्याचे यामध्ये डॉर्सी यांनी नमूद केलं आहे. ही मदत अशा संस्थांना देण्यात येणार आहेत ज्या जगभरामध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन कमाईसंदर्भात काम करणार आहेत. त्याचप्रमाणे मुलींचे आरोग्य आणि शिक्षणसाठी काम करणाऱ्या संस्थांनाही या निधीमधून मदत केली जाणार असल्याचे डॉर्सी यांनी स्पष्ट केलं आहे.

डॉर्सी यांनी आतापर्यंत कधीच ते करत असलेल्या समाजकार्याबद्दलची माहिती उघड केली नव्हती. मात्र त्यांनी आता ही सर्व माहिती जनतेसाठी खुली केली आहे. एका पब्लिक डॉक्युमेंटची लिंक त्यांनी शेअर केली असून त्यावर डॉर्सी यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या समाजकार्यासंदर्भातील निधीची माहिती पाहता येणार आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार डॉर्सी यांची एकूण संपत्ती ३.३ बिलियन डॉलर इतकी आहे. तसेच ट्विटरच्या माध्यमातून मदत करण्याऐवजी त्यांनी स्क्वेअर इनच्या माध्यमातून निधी देण्याचा निर्णय घेण्यामागे एक खास कारण असल्याचे सांगितलं जात आहे. स्क्वेअर इनच्या मालकीमध्ये डॉर्सी यांचा वाटा हा ट्विटवमधील वाट्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच त्यांनी स्क्वेअर इनमधील हिस्सेदारी विकून त्या माध्यमातून टप्प्या टप्प्यामध्ये हा निधी दिला जाणार आहे.

अमेरिकेमध्ये तीन लाख ८० हजारहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर एकूण १२ हजार ३०० जणांचा अमेरिकेमध्ये करोनामुळे मृत्यू झाला आहे.