करोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातला असून प्रत्येक देश आपापल्या परीने त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही देश इतर देशांना मदत करत आहेत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी अशा देशांना सलाम ठोकत त्यांचं कौतुक केलं आहे. भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केलं आहे. पीटीआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असून अमेरिकेत त्याची पडताळणी केली जात आहे. अमेरिकेतील १५०० रुग्णांवर या औषधाचा वापर केला जात आहे. अमेरिकेनंतर इतर देशांनीही भारताकडे आम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

“करोनाशी लढा देण्यासाठी सर्व जगात एकता निर्माण झाली पाहिजे अशी भावना संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ प्रत्येक देश जो मदत करण्यास समर्थ आहे त्याने इतर देशांना मदत केली पाहिजे. जे अशी मदत करत आहेत त्यांना आमचा सलाम आहे,” असं अँटोनियो ग्युटेरेस यांनी म्हटलं असल्याची माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे .भारत इतर देशांना औषधांचा पुरवठा तसंच इतर मदत पुरवत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

करोनाशी लढा देण्यासाठी इतर देशांमधून वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. केंद्र सरकारने ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.

अमेरिका, मॉरिशिअस सारख्या देशांमध्येभारताने औषधांचा पुरवठा केला असून त्यांना तो मिळाला आहे. तर इतर देशांना या आठवड्यात हे औषध उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. भारताने ही मागणी पूर्ण केल्यानंतर आपण भारताने उपकार विसरु शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आहेत त्यांचा वापर स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या रोगात केला जातो. मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे हे औषध आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी २१ मार्चला या गोळ्यांचा वापर करण्याचे सुचवल्याने त्याला महत्व आले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर अ‍ॅझिथ्रोमायसिन बरोबर केला तर करोनावर चांगला उतार पडतो असा दावा ट्रम्प यांनी केला होता.