करोनाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. प्रचंड वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती बिकट झाली असून, देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचेच चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशात १,५२,८७९ जणांना करोनाची लागण झाल्याची समोर आलं आहे. दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, कालपर्यंत आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा वेग कायम

राज्यात शनिवारी दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ००५ रुग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.