देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे देशवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकतीच गेल्या २४ तासातली आकडेवारी जाहीर केली आहे. यावरुन हे लक्षात येत आहे की देशातल्या करोना रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली आहे.

देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात ३९ हजार ६४९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर सध्या देशात ४ लाख ५० हजार ८९९ रुग्ण उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात केरळहूनही अधिक उपचाराधीन रुग्ण…

काल दिवसभरात देशात ३७ हजार १५४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यापैकी केरळमध्ये १२ हजार २२० रुग्ण आढळून आले तर महाराष्ट्रात ८ हजार ५३५ रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातल्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही २००० ने वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता केरळहूनही अधिक करोना रुग्ण उपचार घेत आहेत.

मृतांची संख्या….

गेल्या २४ तासात देशातल्या ७२४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ४ लाखांच्याही वर गेली आहे. देशात आत्तापर्यंत ४ लाख ८ हजार ७६४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरण….

काल दिवसभरात देशातल्या १२ लाख ३५ हजार २८७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी ७ लाख ८६ हजार ४७९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४ लाख ४८ हजार ८०८ इतकी आहे. त्यामुळे आता देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ३७ कोटी ७३ लाख ५२ हजार ५०१ वर पोहोचली आहे.