देशात करोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली असून, दररोज हजारो करोना रुग्णांचे ऑक्सिजन, बेड, इतर कारणांमुळे बळी जात आहे. बंगळुरूमध्येही परिस्थिती अधिक गंभीर असून, दररोज होणाऱ्या शेकडो करोना मृत्यूंमुळे स्मशानभूमीबाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना स्मशानभूमींचा शोध घ्यावा लागत असल्याचं ह्रदयद्रावक चित्र समोर आलं आहे. चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर चक्क ‘हाऊस फुल’चा फलक लावण्यात आला आहे.

करोनामुळे अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली असून, मोठ्या संख्येनं मृतदेह आणले जात आहेत. महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या बंगळुरूतील चामराजपेटमधील स्मशानभूमीबाहेर चक्क ‘हाऊस फूल’चा बोर्ड लावण्यात आला आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने बोर्ड लावण्यात आला आहे. स्मशानभूमीत २० पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नवीन मृतदेह घेण्यास नकार दिला जात आहे.

बंगळुरूमध्ये १३ अशा स्मशानभूमी आहेत, जिथे विद्युत शवदाह वाहिन्या आहेत. मात्र, करोनाचा उद्रेक झाल्यानंतर आणि मृतांची संख्या वाढल्याने त्यांची क्षमता संपली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने बंगळुरूजवळ असलेल्या ब्रुहाट बंगळुरू महापालिका हद्दीतील २३० एकर जागा पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आरक्षित केली आहे. शहरातील स्मशानभूमींवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी कर्नाटकात २१७ करोना मृत्यूची नोंद झाली. यापैकी ६४ मृत्यू हे फक्त बंगळुरू शहरातील होते. स्मशानभूमींबाहेर लागणाऱ्या रांगा लक्षात घेऊन सरकारनं स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यासही परवानगी दिली आहे. कर्नाटकातील एकूण रुग्णसंख्या रविवारी १६ लाखांवर पोहोचली. राज्यात ३७ हजार ७३३ रुग्ण आढळून आले, तर आतापर्यंत राज्यात १६ हजार ११ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.