अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर मोठ्या देशांशी तुलना करता अमेरिका फार उत्तम प्रकारे करोनाशी लढा देत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी करोनाशी लढताना भारताला खूप गंभीर समस्यांना सामोरं जाव लागत असून चीनमध्ये संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचंही सांगितलं आहे. भारतात सध्या करोनाचे १८ लाख ५५ हजार ७४५ रुग्ण आहेत. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“मला वाटतं आम्ही खूप चांगली कामगिरी करत आहोत. इतर कोणत्याही देशाशी तुलना करता आम्ही खूप चांगलं काम करत आहोत. जर तुम्ही नीट पाहिलंत, त्यातही खासकरुन करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या देशांकडे तर आमची कामगिरी चांगली आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इतर मोठ्या देशांशी तुलना केल्यासही आम्ही करोना व्हायरसशी आम्ही उत्तम प्रकारे लढा देत आहोत असंही ते म्हणाले आहेत.

“चीन किंवा भारतापेक्षा आपण खूप मोठे आहोत हे विसरु नका, चीनमध्ये सध्या संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही गंभीर समस्या आहेत. इतर देशांमध्येही समस्या आहेत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.

“मी बातम्यांमध्ये कुठेही याचा उल्लेख वाचला किंवा पाहिलेला नाही. कोणत्याही बातम्यांमध्ये इतर देशांचा उल्लेख मी वाचला नाही. अनेक देश ज्यांना आपण करोनावर नियंत्रण मिळवलं आहे असं वाटत होतं तिथे अचानक वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपल्याला फ्लोरिडामध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचं वाटलं आणि अचानक तिथे पुन्हा करोनाने शिरकाव केला. करोना फिरुन पुन्हा येत असतो,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आतापर्यंत ६ कोटी लोकांची करोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. “इतर कोणताही देश आमच्या आसपास नाही. देशात मिनिटाला १५ ते २० चाचण्या होत असून त्याचा रिपोर्टही तात्काळ दिला जात आहे. कोणाचीही इतकी क्षमता नाही. मला वाटतं आम्ही खूप चांगलं काम करत आहोत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प यांनी अमेरिका चांगली प्रगती करत असून पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सहा टक्क्यांनी खाली आल्याचं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी देशवासीयांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क तसंच सुरक्षेचे इतर नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.