बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधून आलेल्या दोन जणांची माहिती करोना मदतकेंद्राला देणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सीतामढीमधील मधौल गावातील एका कुटुंबातील दोनजण महाराष्ट्रामधून परत आले. या दोघांची माहिती गावात राहणाऱ्या बबलू कुमार या तरुणाने करोना मदतकेंद्राला कळवली. त्यामुळेच गावामध्ये दाखल झालेले दोघेही नाराज झाले. करोना मदतकेंद्रामधून फोन आल्याने या दोघे आरोग्य केंद्रात जाऊन करोना चाचणीचे सॅम्पल देऊन आले. त्यानंतर या दोघांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांना सोबत घेऊन बबलूला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये बबूलीचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस गावामध्ये पोहचले. त्यांनी हत्येचा आरोपाखाली या सात जणांना अटक केली आहे. या सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. गावकऱ्यांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

बिहार सरकारने गावांमध्ये परराज्यामधून परत आलेल्या स्थानिकांची माहिती करोना मदतकेंद्राला देणं बंधनकारक केलं आहे. या माहितीच्या आधारे करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून संक्षयितांची चाचणी केली जात आहे. मात्र या लोकांची माहिती देणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल राज्यातील पोलिसांनी काहीच उपाययोजना केलेली नसल्याने अशी माहिती देणाऱ्यांवर हल्ले केले जात आहे.

२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर परराज्यातून अनेक कामगार आपल्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. हजारो कामगार राष्ट्रीय महामार्गांवरुन चालत आपल्या राज्यात जाण्यासाठी परत निघाले आहेत. आता या कामगारांमुळे करोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने प्रत्येक राज्य दुसऱ्या राज्यातून परत येणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करत आहे.