28 November 2020

News Flash

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत देशाचे अस्तित्वच पणाला

२०१६ पेक्षा सर्वाधिक मतदारांनी ३ नोव्हेंबर आधीच मतदान केले असून त्यामुळेही जनतेचा कल कुणाकडे याबाबत उत्कंठा आहे

| November 3, 2020 12:04 am

(संग्रहित छायाचित्र)

 

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अवघ्या काही तासांवर (३ नोव्हेंबर) येऊन ठेपली असताना अमेरिकेला महान करण्याची प्रलोभने दाखवणारे रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार की, ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणजे सर्वसमावेशक अमेरिकेची खंडित परंपरा पुढे नेणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व माजी उपाध्यक्ष जो बायडेन बाजी मारणार याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत.

या निवडणुकीचा निकाल साधा सरळ लागण्याची शक्यता कमी असून निकालास उशीर तर होणार आहेच शिवाय ट्रम्प यांनी आधीच आपण निकाल मान्य करणार नाही, अशी भूमिका काही तास आधी पुन्हा एकदा घेतल्याने निवडणूक निकालाचा वाद न्यायालयात जाण्याच्या शक्यतेने अनिश्चिततेचे  सावट आहे.

२०१६ पेक्षा सर्वाधिक मतदारांनी ३ नोव्हेंबर आधीच मतदान केले असून त्यामुळेही जनतेचा कल कुणाकडे याबाबत उत्कंठा आहे. करोना काळातील प्रचार, करोना संसर्ग झालेला असताना अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले बेदरकार वर्तन, एकमेकांवर केलेले व्यक्तिगत आरोप यामुळे ही निवडणूक गाजली हे तर खरेच, पण अमेरिकी लोकशाही ज्या तत्त्वांवर उभी आहे त्यांची अग्निपरीक्षा पहिल्यांदाच या निवडणुकीत होत आहे. कृष्णवर्णीयांविरोधातील पोलिसी अत्याचार त्यानंतर उसळलेल्या दंगली यामुळे ट्रम्प हे वर्णवर्चस्ववादी असल्याचे स्पष्ट झाले, ब्लॅक लाइव्हज मॅटर या चळवळीचा आताच्या मतदानावर काही प्रमाणात प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

निवडणुकीला ३६ तास उरले असताना ट्रम्प यांनी मुख्य राज्ये असलेल्या मिशीगन, आयोवा, नॉर्थ कॅरोलिना येथे प्रचारसभा घेतल्या तसेच जॉर्जिया व फ्लोरिडातही भर दिला. बायडेन यांनी अतिशय अटीतटीच्या पेनसिल्वानियामध्ये सभा घेतल्या. बायडेन यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांना करोनाची साथ गलथानपणे हाताळल्याबाबत लक्ष्य केले होते. अमेरिकेत २ लाख २९  हजार लोक करोनाने मरण पावले त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसेल अशी अपेक्षा आहे.

सुरुवातीपासूनच ट्रम्प यांनी निवडणूक निकाल आपण मान्य करणार नाही असा रडीचा डाव सुरू केला असून त्यांनी आताही असे सांगितले की, टपालाचे व लोकांनी मतपत्रिकातून आधीच केलेले मतदान मोजण्याबाबत वाद घातले आहेत. पेनसिल्वानियातील टपाली मते व इतर मते याबाबत त्यांनी आधीच आक्षेप घेतले आहेत. निवडणुकीनंतर  ही मते गोळा करून त्यांची गणना करणे भयानक आहे. त्यात बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीची रात्र संपताच आम्ही वकिलांची गाठ घेऊन न्यायालयात दाद मागणार आहोत असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या परिस्थितीत जनमत चाचण्यानुसार  ट्रम्प यांना जिंकण्याची ४२ टक्के संधी असून बायडेन यांना ५१ टक्के संधी मिळणार आहे. दी न्यूयॉर्क टाइम्सच्या मते बायडेन यांची बाजू भक्कम असून २००८ पासूनच्या कुठल्याही अध्यक्षीय उमेदवारापेक्षा त्यांची बाजू मजबूत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी देऊन भारतीय वंशाच्या लोकांची मते खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

करोनाच्या अतिशय आव्हानात्मक काळात ही निवडणूक होत असून गेल्या वर्षी जूनमध्येच ट्रम्प यांनी प्रचार सुरू केला होता. ट्रम्प यांनी करोना विषयीच्या सर्वच बातम्या फेक न्यूज आहेत असे सांगून नेहमीच प्रसारमाध्यमांची हेटाळणी केली. त्यांच्या काळात भूराजकीय समीकरणे उलटीपालटी झाली. मेक्सिकोच्या भिंतीचा वाद गाजला, त्यांनी एच १ बी व्हिसा तात्पुरता बंद करून टाकला त्याचा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना बसला.

चीनशी त्यांनी उघडपणे पंगा घेतला. त्यामुळे चीन व अमेरिका यांच्या दक्षिण चिनी महासागरात वाद सुरू असून त्यात अमेरिका नेहमीच शक्तिप्रदर्शन करीत आहे. भारत-चीन वादातही अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे त्यामुळे ट्रम्प हे भारताला उपयुक्त आहेत असे चित्र निर्माण झाले असले तरी ते भ्रामक आहे.

३ नोव्हेंबरला मतदान कसे होणार ?

३ नोव्हेंबर हा अमेरिकी निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा दिवस असून अमेरिकेतील सिनेटच्या ३५ जागा, अमेरिकी काँग्रेसच्या ४३५ जागा याशिवाय अकरा राज्यांचे गव्हर्नर यासाठी मतदान होत आहे. एकूण १० कोटी मतदारांनी आधीच मतदान केले असून काहींनी व्यक्तिगत पातळीवर, काहींनी टपालाने व मतपेटीतून मतदान केले. २०१६ मधील निवडणुकीत जे मतदान आधीच झाले होते त्यापेक्षा हे प्रमाण ६४ टक्के आहे, मतदारांचा उत्साह अधिक असून मोठय़ा प्रमाणावर मतदान यावेळी झाले आहे. ९.३२ कोटी मतदान आधीच मतपत्रिकेने झालेले असून ३.१९ कोटी मतदारांनी टपालाने मतदान केले आहे म्हणजे एकूण १० कोटीहून अधिक मतदान झाले आहे. एकूण मतदार २४ कोटी आहे.

अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, ओरेगॉन  या राज्यांत आहे. त्यांना ब्लू स्टेटस म्हणतात. रिपब्लिकनांचे वर्चस्व अरकासान्स, ओक्लाहोमा, लुईझियाना या राज्यांत आहे. त्यांना रेड स्टेटस म्हणतात.

अटीतटीच्या राज्यात कुणाची आघाडी आहे?

बायडेन हे आठही राज्यांत जनमत चाचणीनुसार आघाडीवर आहेत. अ‍ॅरिझोना, फ्लोरिडा, आयोवा, मिशीगन, नेवाडा, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वानिया, विस्कॉन्सिन ही ती राज्ये आहेत. पण या राज्यांत दोघांमधील फरक पाच टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. ट्रम्प हे जॉर्जिया व ओहायो या दोन राज्यांत आघाडीवर आहेत. टेक्सासमध्येही ते आघाडीवर आहेत पण तो रिपब्लिकनांचा बालेकिल्ला आहे. यावेळी तेही अटीतटीच्या राज्यांत समाविष्ट आहे.

‘अध्यक्षपदाच्या पहिल्याच दिवशी करोना कृती योजना’

अमेरिकी अध्यक्षपदावर निवडून आल्यास पहिल्याच दिवशी करोनाचा सामना करण्यासाठी कृती योजना जाहीर करू, असे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. माजी उपाध्यक्ष असलेल्या बायडेन यांनी फिलाडेल्फिया येथे रविवारी सांगितले, की, मी अध्यक्ष झालो तर पहिल्याच दिवशी करोनाचा सामना करण्यासाठी कृती योजना  जाहीर करून मुखपट्टी, सामाजिक अंतर, चाचण्या, रुग्णशोध याला प्राधान्य दिले जाईल. औषधे व लस मोफत दिली जाईल. शुक्रवारी देशात १ लाख रुग्ण वाढले असून त्यात पेनसिल्वानियात एका दिवसात २६०० रुग्ण  सापडले. हा उच्चांक आहे. गेल्या तीन वर्षांत बराक ओबामा व मी सत्तेवर असताना बरेच रोजगार निर्माण केले होते.

अटीतटीची राज्ये म्हणजे काय?

अमेरिकेत अध्यक्षाची निवड थेट होत नाही. प्रतिनिधी मंडळ या घटनात्मक गटामार्फत होते त्याचे ५३८ सदस्य आहेत. प्रत्येक राज्याचे विधिमंडळ हे प्रतिनिधी मंडळातील प्रतिनिधी निवडत असते. त्यात माइने व नेब्रास्का हे त्याला अपवाद आहेत. कॅलिफोर्नियाला ५५ प्रतिनिधी मते असून निवडणूक जिंकण्यासाठी २७० प्रतिनिधी मते गरजेची असतात. ज्या राज्यात दोघांपैकी कुणालाही जिंकण्याची संधी असते त्यांना स्विंग स्टेट म्हणतात. तेथे कोण जिंकेल हे अनिष्टिद्धr(१५५)त असते कारण मतदारांची मते निष्टिद्धr(१५५)त नसतात. ही राज्ये कोणती हे मतमोजणीनंतरच कळते. अमेरिकी निवडणूक विश्लेषण संकेतस्थळ फाइव्हथर्टी एट नुसार २०२० मध्ये अ‍ॅरिझोना, जॉर्जिया, फ्लोरिडा, आयोवा, मिशीगन, मिनेसोटा, नेवाडा, न्यूहॅम्पशायर, उत्तर कॅरोलिना, ओहिओ, पेनसिल्वानिया, टेक्सास, विस्कॉन्सिन ही अटीतटीची राज्ये आहेत. ही राज्ये मताधिक्य ठरवतात असा याचा अर्थ आहे. त्यातील प्रतिनिधी मतांचे प्रमाण सहा मोठय़ा राज्यात पुढीलप्रमाणे आहे. कॅलिफोर्निया ५५, टेक्सास ३८, न्यूयॉर्क, २९, फ्लोरिडा २९, इलिनॉइस २०, पेनसिल्वानिया २०.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:04 am

Web Title: country very existence in the us presidential election abn 97
Next Stories
1 न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री
2 भाजप-बसप यांची युती अशक्य
3 कमलनाथ यांच्या विरोधातील कारवाईला स्थगिती
Just Now!
X