नवी दिल्ली :वर्षभरापूर्वी पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी लष्करासमवेत झालेल्या धुमश्चक्रीत २० जवान हुतात्मा झाले होते. त्यांनी देशासाठी केलेले प्राणार्पण देशाच्या एकात्मतेसाठी महत्त्वाचे होते. चीनच्या अभूतपूर्व आक्रमणास त्यांनी धैर्याने तोंड दिले अशा शब्दांत लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी हुतात्मा जवानांचा गौरव केला आहे.

गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत भारताचे वीस जवान हुतात्मा झाल्याच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्ताने नरवणे यांनी सांगितले की, आपल्या जवानांनी देशरक्षण करताना सर्वोच्च त्याग केला असून प्रतिस्पर्धी देशाशी लढताना त्यांनी अत्यंत अवघड प्रदेशात शौर्य गाजवले व प्राणार्पण केले असून त्यांचा हा त्याग सदैव देशाच्या स्मृतीत कोरला जाईल.

गेल्या पाच दशकांत भारत-चीन यांच्या दरम्यान प्रथमच चकमक झाली होती त्यात वीस भारतीय जवान गेल्या १५ जूनला गलवान खोऱ्यात हुतात्मा झाले होते. फेब्रुवारीत चीनने अशी कबुली दिली होती की, त्यांचे पाच अधिकारी व सैनिक या चकमकीत मारले गेले होते. चीनच्या मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या ३०—३५ असण्याची शक्यता अमेरिकी गुप्तचरांनी  व्यक्त केली होती.

लष्कराच्या लेह येथील  फायर अँड फ्युरी या १४ व्या कोअरने गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांना पहिल्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली. फायर अँड फ्युरीचे प्रमुख अधिकारी मेजर जनरल आकाश कौशिक यांनी लेह युद्धस्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केले. लष्कराने म्हटले आहे की, देश अतिउंचीवरच्या या प्रदेशात चीनच्या सैन्याचे आक्रमण परतवून लावणाऱ्या सैनिकांप्रती देश ऋण व्यक्त करीत आहे.

 

त्यांचा सर्वोच्च त्याग देश विसरणार नाही. गलवान खोऱ्यातील चकमकीत १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांनी आघाडीवर राहून चिनी सैन्याचा मुकाबला केला होता . गलवानमधील गस्त बिंदू क्रमांक १४ येथे धुमश्चक्रीत त्यावेळी ते हुतात्मा झाले. नंतर त्यांना जानेवारीत मरणोत्तर महावीर चक्र देण्यात आले होते. इतर चार सैनिकांना मरणोत्तर वीर चक्र देण्यात आले. लष्कराने पूर्व लडाखमधील छावणी क्रमांक १२० येथे गॅलंटस ऑफ गलवान हे स्मारक उभारले आहे. त्या ठिकाणी या धुमश्चक्रीत हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत. स्न्ो लेपर्ड मोहिमेत त्यांनी चिनी लष्कराला थोपवून मर्दुमकी गाजवली होती. या धुमश्चक्रीचे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधावर अभूतपूर्व  परिणाम होतील असा स्पष्ट इशारा परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी नंतर चीनला दिला होता.

शहीद कर्नल बाबू यांच्या पुतळ्याचे अनावरण

सूर्यपेठ (तेलंगण) : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या जून महिन्यात चीनच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या पुतळ्याचे मंगळवारी तेलंगणचे मंत्री के. टी. रामाराव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कर्नल बाबू हे सूर्यपेठचे रहिवासी होते. तेलंगण सरकारने बाबू यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले असून त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी (गट-१) आणि हैदराबादमध्ये निवासी भूखंड दिला आहे.

सरकारने देशाला विश्वासात घ्यावे – सोनिया गांधी</strong>

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चीनच्या लष्करासमवेत झालेल्या संघर्षांत गेल्या वर्षी भारताचे २० जवान शहीद झाले त्याबाबतची सत्य माहिती सरकारने देशवासीयांना द्यावी, असे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी म्हटले आहे. सीमेवर जैसे थे स्थिती ठेवण्याच्या कार्यात कितपत प्रगती झाली तेही स्पष्ट करावे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. चीनच्या लष्कराकडून सीमेचे उल्लंघन करण्यात आले, मात्र त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्कार केला त्यामुळे चीनकडून निश्चित कोणती कारवाई करण्यात आली त्याबद्दल  सुस्पष्टता नाही, असे गांधी यांनी  म्हटले आहे.