पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील देशद्रोहाच्या खटल्याप्रकरणी गुरुवारी येथील न्यायालयात नाटय़मय घटना घडून आपण राजीनामा देणार नसल्याचे मुख्य न्यायमूर्ती फैझल अरब यांनी स्पष्ट केले.
मुशर्रफ यांच्या विरोधात विशेष न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी त्रिसदस्यीय खंडपीठापुढे खटला सुरू आहे. मात्र न्या. फैझल अरब यांचे वर्तन पक्षपाती असल्याचा आरोप मुशर्रफ यांचे वकील अन्वर मन्सूर यांनी वारंवार केल्यानंतर संतप्त झालेल्या अरब यांनी न्यायालयातून बाहेर पडणे पसंत केले. मात्र, आपण केवळ आजच्या दिवसाच्या कामकाजापासून दूर होत असून या खटल्याच्या कामकाजापासून दूर होत नसल्याचे न्या. अरब यांनी स्पष्ट केले. त्याआधी, देशात न्याायाधीशांची कमतरता नसल्याचे सांगत न्या. अरब यांनी आपण या खटल्यापासून दूर होत आहोत, असे उद्वेगाने सांगितले होते.