भाजपचे नेते अरुण जेटली यांच्या दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार संशयित आरोपींना दिल्लीच्या न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.
दिल्लीचे पोलीस कॉन्स्टेबल अरविंद दबास, अनुराग सिंग, नीरज नायर आणि नितीश सिंग या तिघा खासगी डिटेक्टिव्हना मुख्य महानगर दंडाधिकारी अमित बन्सल यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेसह दोन जामीनदारांसह हा जमीन मंजूर केला. याप्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पुढील तपासासाठी या संशयितांची आवश्यकता नाही, या मुद्दय़ावर हा जामीन मंजूर करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनुराग सिंग हा अरुण जेटली यांच्या दूरध्वनींचे तपशील जमा करीत होता, असे सांगण्यात आले. अमरसिंग यांच्या दूरध्वनी टॅपिंग संदर्भातही अनुरागला २००५ मध्ये अटक करण्यात आली होती.