ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगात पुन्हा खळबळ उडालेली असताना त्यावर भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संशोधन संस्था आयसीएमआरनं महत्वपूर्ण संशोधन केलं आहे. या संशोधनानुसार, कोव्हॅक्सिन लसीने या नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरणारी अॅन्टीबॉडी विकसित करण्याची क्षमता आहे. कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी करोना प्रतिबंधक लस असून हैदराबादच्या भारत बायोटेकने पुण्यातील नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (एनआयव्ही) मदतीने तयार केली आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात आयसीएमआरनं घोषणा केली होती की, जे लोक ब्रिटनमधून भारतात आले होते आणि त्यांना या नव्या स्ट्रेनची बाधा झाली होती त्यांच्याद्वारे एनआयव्हीनं यशस्वीरित्या स्ट्रेनला यशस्वीरित्या आयसोलेट आणि कल्चर्ड करण्यात आलं आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला हा नवा स्ट्रेन पूर्वीच्या करोना विषाणूपेक्षा ५० ते ७० टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्याचबरोबर तो जुन्या विषाणूपेक्षा जास्त घातक असल्याचेही काही प्रकरणांतून समोर आलं होतं. मात्र, यावर अजूनही संशोधन सुरुच आहे.

भारत बायोटेकनं यापूर्वीच कोव्हॅक्सिन ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनविरोधात काम करेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्याचबरोबर इतर देशांनी तयार केलेल्या फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका या कंपन्यांनीही आपली लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा केला होता.