गुजरातमधील भाजपा आमदाराने करोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राजकोट (दक्षिण) मदतदासंघाचे भाजपा आमदार असणाऱ्या गोविंद पटेल यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करतात त्यामुळेच त्यांना करोनाचा संसर्ग होत नाही, असं पटेल यांनी म्हटलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करोना नियमांचे उल्लंघन होत आहे असं तुम्हाला वाटत नाही का?, या प्रश्नाला उत्तर देताना पटेल यांनी हे वक्तव्य केलं आहे. “जे खूप मेहनत करतात त्यांना करोनाचा संसर्ग होत नाही. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती आहेत. त्यामुळेच भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला करोनाचा संसर्ग झालेला नाही,” असं पटेल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

मागील महिन्यामध्ये स्थानिक निवडणुकांसाठी प्रचार करताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्याचबरोबरच राज्यामध्ये पक्षा संघटनेचे प्रमुख सी. आर. पाटील यांच्यासहीत सत्ताधारी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना करोनाचा संसर्ग होऊ गेला आहे. वडोदऱ्याचे भाजपाचे खासदार रंजनबेन भट्ट यांनी शनिवारी करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. उपचारांसाठी आपण रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याचेही भट्ट यांनी सांगितलं होतं.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी स्थानिक निवडणुका आणि अहमबादामध्ये कसोटी तसेच टी-२० मालिका आयोजित केल्याने करोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावाचा फेटाळून लावला आहे. “संविधानातील तरतुदींनुसार स्थानिक निवडणुका घेण्यात आल्या आहेत. क्रिकेटचे सामने केवळ अहमबादामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील रुग्णवाढीला या दोन गोष्टी कारणीभूत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. महाराष्ट्रात निवडणुकाही झाल्या नाहीत आणि क्रिकेटचे सामनेही झाले नाहीत. मात्र देशामध्ये करोना संसर्गाची रोजची जी आकडेवारी समोर येत आहे त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत,” असं पटेल यांनी म्हटलं आहे.

सध्या राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली आहे यासंदर्भात आताच कोणता निष्कर्ष काढता येणार नाही असं म्हटलं आहे. मात्र संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करणं ही सार्वजनिक जबाबदारी असल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे.

गुजरातमध्ये एका आठवड्यात १ हजार ५८० नवे रुग्ण आढळून आले. २८ नोव्हेंबरनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. गुजरातमध्ये मागील सात दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीनंतरची ही राज्यातील सर्वाधिक वाढ आहे.