महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. दिल्ली सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास पाच राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना करोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यावरच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय केजरीवाल सरकारनं घेतला आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. या राज्यांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत इतर राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. करोनाच्या तीन लाटांमधून बाहेर पडलेल्या दिल्लीत पुन्हा करोना बळावू नये, यासाठी केजरीवाल सरकारनं विषाणूला वेशीवर रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्यात आहेत.

दिल्ली सरकारने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून करोना निगेटिव्ह रिपोर्ट असल्यावरचं दिल्लीत प्रवेश करू देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे.

देशात २४ तासांत १३ हजार ७४२ जण करोना पॉझिटिव्ह

मागील २४ तासांतील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ७४२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून निष्पन्न झालं आहे. तर १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १०४ मृतांबरोबरच देशातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १,५६, ५६७ इतकी झाली आहे. २४ तासांच्या कालावधीत १४ हजार ३७ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.