राज्यात सध्या Serum च्या Covishield लसीच्या किंमतीची चर्चा सुरू आहे. Adar Poonawalla यांनी १ मे पासून कोविशिल्ड लसीची किंमत जाहीर केली असताना आता भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. भारत बायोटेकच्या दरपत्रकानुसार कोवॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपये प्रतिडोस, खासगी रुग्णालयांना १२०० रुपये प्रतिडोस इतक्या किंमतीला घ्यावी लागणार आहे. याशिवाय, परदेशात निर्यात करण्यासाठी लसीची किंमत १५ ते २० डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारसाठी कोवॅक्सिनचा दर १५० रुपयेच असणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसीचे दर जास्त असल्याच्या प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांत उमटू लागल्या होत्या. सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी नुकतेच कोविशिल्डचे नवे दर जाहीर केले होते. यानुसार राज्य सरकारला कोविशिल्ड ४०० रुपये प्रतिडोस तर खुल्या बाजारात खासगी रुग्णालयांना प्रतिडोस ६०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. Bharat Biotech ने कोवॅक्सिनचा केंद्र सरकारसाठीचा दर १५० रुपयेच ठेवण्याची तयारी केली असताना कोविशिल्डचे दर मात्र वाढवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.

Covishield Vaccine : जगभरात सिरमच्या लसीची सर्वाधिक किंमत भारतात!

दरम्यान, कोविशिल्ड लसीचे भारतातील दर हे जगभरातील दरांपेक्षा जास्त असल्याचं देखील समोर आलं होतं. जगभरात अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका या भागात कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, भारतातील नव्या दरांनुसार लसीचा एक डोस आंतरराष्ट्रीय दरांनुसार ८ डॉलरपर्यंत जाणार आहे. जगात कुठेही कोविशिल्ड लसीच्या डोसची इतकी किंमत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. यापैकी बहुतेक देशांमध्ये लस मोफत दिली जात असून त्याचा खर्च तेथील सरकार उचलत आहे. सध्या युरोपातील देशांमध्ये कोविशिल्डच्या एका डोससाठी २.२५ ते ३.५० डॉलर, ब्राझीलमध्ये ३.१५ डॉलर, ब्रिटनमध्ये ३ डॉलर तर अमेरिकेत ४ डॉलर इतकी किंमत मोजली जात आहे.

Adar Poonawalla : हे असं का? फरहान अख्तरचा थेट अदर पूनावालांना सवाल…!

एकीकडे कोविशिल्डच्या डोसची किंमत जास्त असल्याची प्रतिक्रिया उमटत असताना आता कोवॅक्सिनचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातमूल्य थेट १५ ते २० डॉलर (११०० ते १५०० रुपये) ठरवण्यात आल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कोवॅक्सिनची किंमत कोविशिल्डपेक्षा जास्त ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी १५० रुपये प्रतिडोस याच दराने खरेदी केल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सरकार आणि लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, यांच्यामध्ये नेमक्या किती किंमतीला ही लस केंद्र सरकारला मिळणार, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.