पश्चिम बंगालमधील लोकशाहीविरोधी तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी माकपशी आघाडी करावी, अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते करीत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी केला आहे.

तथापि, याबाबत अधिक भाष्य करण्याचे चौधरी यांनी टाळले आहे. या संदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या मोठय़ा गटाला माकपशी आघाडी हवी आहे, असे ते म्हणाले.

तृणमूल काँग्रेस आणि भाजप हे पक्ष पश्चिम बंगालमध्ये जातीयवादाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र लढण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. बंगालमधील माकप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आघाडी करण्याबाबतची चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रवक्ते ओमप्रकाश मिश्रा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून डाव्या आघाडीशी युतीची  सूचना केली होती.