स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या प्रश्नावर आज (शुक्रवार) कांग्रेस कोर ग्रुपची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. गुरुवारी कांग्रेसचे प्रदेश प्रभारी आणि महासचिव दिग्विजय सिंह म्हणाले कि, तेलंगणावरील निर्णयाचा निर्णय आता अधिक काळ लांबणीवर टाकता येणार नाही.
तेलंगणाच्या मुद्यावरून होणा-या कॉंग्रेसच्या बैठकीनंतरच्या निर्णयाची संपूर्ण आंध्र प्रदेशला उत्सुकता लागून राहिली आहे. आपल्या मागण्यांचे पक्ष श्रेष्ठींकडे समर्थन करण्यासाठी तेलंगणा आणि तेलंगणा परिसरातील कांग्रेस नेते दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. वेगळ्या राज्याची मागणी आणि अविभाजित आंध्र प्रदेशच्या आपल्या मागणीबाबत दबाव आणण्यासाठी या सर्व नेत्यांना दिल्लीमध्ये कांग्रेस महासचिव आणि आंध्र प्रदेश प्रकरणी पक्षाचे प्रभारी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली.
आज होणा-या बैठकीला कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित असणार आहेत. त्य़ाशिवाय प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष बोस्ता सत्यनारायण आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांच्यासह काही जेष्ठ नेत्यांचा बैठकीत सहभाग असेल.
आंध्र प्रदेशच्या विद्यार्थी संघटनांतर्फे आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. राज्याचे विभाजन न करता, सद्य परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी या संघटनांची मागणी आहे. आंध प्रदेशच्या १३ जिल्ह्यातील १४ विद्यापीठाचे विद्यार्थी या बंदमध्ये सहभागी झाले असल्याचे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय इतर काही संघटनांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बंदसाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली आहे.